︎︎︎ DOCUMENTARY PORTFOLIO ︎︎︎  


︎︎︎ VISUAL WORK ︎︎︎  






︎︎︎ EXTERNAL LINKS ︎︎︎



© Sumit Sute
All Rights Reserved
Landscape Mode/Bigger Screens adviced.



//
This is a collaborative project with Niranjan’s marathi poem 'Conceit' and a slow slideshow of my gif triptychs to articulate self-deception and urban loneliness through the context of career aspirations. Originally intended to record his work as a mechanical inventor, the image-making channelled our urban male friendship and was also my projection of the shared anxiety and odd slowness in our careers. While Niranjan’s poetry, an ungracious child of anger and grief, is a confessional retrospect on conceit.


//
निरंजनची कविता आणि माझ्या फोटो-त्रिकुटाच्या प्रत्येकी १५ सेकंदांच्या जिफचा स्लो स्लाईडशो म्हणजे हा निरंजन बरोबरचा माझा एकत्रित प्रयोग. करियर आणि स्वप्नांमागे धावताना पायात अडकलेला नाकबूल स्वभाव आणि शहरी एकाकीपणा ह्यांत गुरफटलेली हि आमची गोष्ट. खरंतर सुरुवातीला निरंजनच्या यांत्रिक संशोधनावर फोटोपट करायचा असा घाट होता, पण हळू हळू ह्या प्रयोगातूनच आम्हा मुला-मुलांची शहरी दोस्ती गहिरी होत गेली आणि दोघांच्या संथ करियर मधील एकमेकांच्या अस्वस्थतेचा सारखेपणा ह्या प्रयोगात माझ्याकडून उमटला. आणि निरंजनची हि कविता त्याच्या घमेंडीवर गतावलोकन करणारे त्याचेच एक दुखावलेले अपत्य आहे.






मी माज करतो
लै माज करतो
मजा येती लै माज करण्यात
मी माज केला
बिगशॉट स्वप्नांचा माज केला
त्यासाठी धडपड पण केली
खरच लै धडपड केली
धडपड फेल जातीये
माज उतरतोय
आता मजा नाय वाटत
मी स्वत:ला लै श्याना समजतो
खरच मी स्वतःला लै श्याना समजतो
बाकी दुनियेला उडवून लावतो
सगळ्यांना खुळे समजतो
मला वाटतं की फक्त मलाच सगळ जग नीट समजलंय
आणि मला जे समजलंय तेच अंतिम सत्य आहे
बाकी जनता आपापल्या छोट्या छोट्या विश्वात रमलीये
आणि फक्त मलाच दिसतायेत ही सगळी समांतर विश्व एकाच वेळी
मी यातल्या एका लोकांच्या रेफरन्सनी दुसऱ्या विश्वातल्या लोकांना खुळे ठरवतो
आणि मी सगळ्याच विश्वांमध्ये खुळा ठरतो


मी लोकांशी बोलतो
समोरचा काहीही बोलो मी माझ्याच संदर्भात सगळ बोलतो
मलाच हिरो व्हायचं असत प्रत्येक संभाषणात
समोरच्याला दाखऊन द्यायचं असत त्याच अज्ञान
मी स्वतःला एक दार्शनिक समजतो
या जगाबद्दलची माझी समज लादायची असते मला समोरच्यावर
मग शेवटी समोर कुणीच उरत नाही
ती माझ्याशी बोलत नाही
ती म्हणते माझ्याशी किंवा माझ्याबद्दल बोलण म्हणजे वेळ वाया घालवण
तीला वाटत मी आळसात दिवस काढतो
तीला म्हणालो मी तू ही कधी स्वप्न पाहा
कळेल कदाचीत की मी किती आळसात दिवस काढतोय
ती म्हणते नको तसलं काही छान चाललय आहे तेमग मी तिलाही तुच्छ ठरवतो

मी स्वतःला नीट डिझाईन केल आसत आणि नीट प्रेझेंट केल आसत तर कदाचीत मी सिंगल राहिलो नसतो
मी लोकांचा किमान आदर केला असता तर मी फार एकटा राहिलो नसतो
पण मी मी राहिलो नसतो
असच काहीतरी पांघरूण मी शोधतो
तो म्हणाला होता सेंटर ड्रील मारून कट काढ
मी नाही ऐकल मी पॉलिश पेपरनी रॉड घासला आणि त्याच्या कॉलेजला बोगस ठरवलं
तो म्हणाला होता फक्त बॅकपॅक वापरायला दे संगाड्याऐवजी
मी नाही ऐकल मी स्वतःचच म्हणण खरं केलं आणि त्याच्या देशाला बोगस ठरवलं
तो म्हणाला होता हे एकट्याच काम नाही एखाद्या संस्थेत काम कर
मी नाही ऐकल मी एकटाच खटपट करत राहिलो आणि आधार कार्डाला बोगस ठरवलं
आज हे सगळे सल्ले खरे ठरतायेत
मी तरीही ऐकत नाहीये
आता न ऐकण हा माझा माज नाही बधीरपणा आहे



मी माज केला नसता तर मी आयआयटीत शिकलो आसतो
पण मी माज केला केमिस्ट्री सोडून देऊन फक्त फिजिक्स शिकण्याचा
मी माज केला नसता तर स्टॅनफर्डला पीजी केल आसत
पण मी माज केला कोलेजला कोलून देऊन इंजिनिअरिंग शिकण्याचा
मी माज केला नसता तर चांगली स्टार्टअप चालू केली आसती
पण मी माज केला हौशी लोकं नाकारून कुणबी लोकं स्वीकारण्याचा
मी माज केला नसता तर नागरिक वगैरे झालो असतो
पण मी माज केला प्राणी म्हणून गुरगुरण्याचा

रानटीपणाचा वास खेचत राहतो मला
तोडून टाकायच्यात मला सगळ्या फायबर ऑपटीक केबल
नाही ऐकायचय नाव नरेंद्र मोदीच किंवा राहुल गांधीच
नाही ऐकायचीयेत इंग्रजी वाक्य नाही पाहायचेत इंग्रजी शब्द
रस्तावर उभा राहिलो तर एकही गाडी दिसू नये असं वाटत
सकाळी घरात ऊन याव आणि रात्री अंगणातून चांदण्या पहाव्यात अस वाटत
नकोय मला आधार कार्ड
जीओच इंटरनेट नकोय फुकटसुद्धा
बीलगेट्सच्या टेरापॉवर कंपनीनी बनवलेले न्युक्लीयर एनर्जी प्रोडक्ट नकोयेत मला

हा खरच माज नाहीये
पण तो माज ठरतोय

माज केला नसता तर पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात आली असती
पण माज केला नसता तर स्वप्नच पहिली नसती








September 2018 - September 2019